पुरूषांना हे शिक्षण दिल्यास काहीप्रमाणात तरी रोखू शकू बलात्कार

पुरूषांना हे शिक्षण दिल्यास काहीप्रमाणात तरी रोखू शकू बलात्कार

आनंद करंदीकर    Oct 06,2020 - Education


मूळ लेख येथे प्रसिद्ध झाला आहे: https://jaglya.com/rape-sex-education/

बलात्काराच्या घटनांमुळे आपण सारेच अस्वस्थ आहोत. पुरूष अशा अमानुष पध्दतीने का वागतात याची अनेक कारणे पुढे येतात, त्याचे अनेक अभ्यास ही झाले आहेत. त्यापैकी एक कारण असे आहे की, स्त्रीवर बळजबरीने संभोग केला तर त्यातून आपल्याला वेगळया प्रकारचा शाररिक आणि मानसिक आनंद मिळेल असे काही पुरूषांना वाटते.

बलात्कार अनेक कारणांमुळे होतात. पुरूषांना आपल्या सत्तेचे प्रदर्शन करायचे असते, काही पुरूष विकृतच असतात, काहींना तिच्यावर सुड उगवायचा असतो, त्या बाईच्या नवऱ्याला किंवा मुलीच्या बापाला अददल घडवायची असते, काहींना कनिष्ठ जातींवर आपले वर्चस्व सिध्द करायचे असते, काहींना विशेषत: युध्दकाळात वंशवृध्दीचे साधन म्हणून बलात्कार करायचा असतो.

मी या विषयावर वाचन केले, त्यातून कोणत्या कारणाने पुरूष बलात्कार करतात, याची विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध झाली नाही. तिहार तुरूंगात बलात्कार केलेल्या आरोपींचा अभ्यास झाला, त्यातूनही यामागच्या कारणांची पुरेशी स्पष्टता झालेली नाही.

आपण स्त्री सुख उपभोगू शकलो नाही, आपण स्त्रीवर बलात्कार केला तर त्यातून शारिरीक व मानसिक सुख मिळेल यासाठी ते बलात्कार करायला उद्युक्त होतात. या पुरूषांना योग्य लैगिंग शिक्षण दिले तर त्यांना यापासून परावृत्त करता येईल.

लैगिंक शिक्षण हा बलात्कारापासून परावृत्त करण्याचा एकमेव मार्ग नाही, तरीही लैंगिक शिक्षणामुळे दोन टक्के, तीन टक्के बलात्कार करू इच्छिणारे पुरूष यापासून थांबले तर चांगले होईल. पुरूषांना हे सांगण्याची गरज आहे, की खरा पुरूषार्थ आपल्या स्त्रीला जास्तीत जास्त आनंद देण्यात आहे. जो हे पुरूष देऊ शकतो, त्यात खरा पुरूषार्थ आहे. जो पुरूष स्त्रीला आनंद देतो, तिला त्यातून समाधान मिळेल याची काळजी घेतो, त्याला त्यातून जास्त आनंद मिळतो. नुकत्याच तारूण्यात प्रवेश करणाऱ्या तरूणांना हे लैगिंक शिक्षण देणे आवश्यक आहे.

स्त्रीला सुखी करण्यातून पुरूषाला जास्त आनंद मिळतो. मात्र हा मुददा लैंगिक शिक्षणात मांडला जात नाही. लैंगिक शिक्षणाच्या कार्यक्रमात मुख्यत: शरीर विज्ञान शिकविले जाते. त्यामध्ये मासिक पाळी, तारूण्यातील बदल काय, गुप्तरोग कसे टाळावेत आदी शिकवले जाते. मात्र लैंगिक शिक्षण बहुतेक वेळा याच चौकटीत बंदिस्त राहते. याविषयावरची पुस्तके, तज्ज्ञांची मते यांचा अभ्यास केला असता, लैंगिक शिक्षणाच्या कार्यक्रमात स्त्रीला सुख देणे सर्वात महत्त्वाचे आहे,

युनेस्कोने लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला मात्र त्यातही याची सविस्तर माहिती नाही. केवळ एक -दोन वाक्यात याचा उल्लेख केला आहे. महिलांशी आदरपूर्वक शरीरसंबंध ठेवावेत असे केवळ यामध्ये नमूद केले आहे.

एनसीआरटी ही दिल्लीची शिक्षणविषयक अभ्यासक्रम ठरवणारी संस्था आहे. त्यांनी चार वर्षांपूर्वी लैंगिक शिक्षणाचा अभ्यासक्रम त्यांच्या संकेतस्थळावरून जाहीर केला होता. मात्र नवीन सरकारने आता हा अभ्यासक्रम संकेतस्थळावरून काढून टाकला आहे. लैंगिक शिक्षण देणे चुक आहे, अशी भुमिका रामदेवबााबांसहीत काहीजणांकडून मांडली जाते आहे, त्या दबावाला बळी पडून तो काढून टाकण्यात आला.

दिल्लीची तारशी (टॉकिंग अबाऊट रिप्रोडक्शन अ‍ॅन्ड सेक्सुअल अब्युस) नावाची एक प्रख्यात संस्था आहे. त्यांचे लैगिंक शिक्षणावर चार खंड प्रसिध्द आहेत. त्यामध्येही शाररिक संबंधातून आनंद मिळायला पाहिजे यावर जेमतेम दोन वाक्य आहेत.

मराठीतील याविषयावरची प्रख्यात आणि पाप्युलर पुस्तके वाचली. विठठल प्रभू,  शशांक सामंक यांची पुस्तके , रस्त्यावर मिळणारी मासिके यांचा अभ्यास केला.

स्त्री-पुरूषांनी एकमेकांशी संबंध ठेवताना परस्पर आदराने वागले पाहिजे, यापलीकडे त्या संबंधीचा उल्लेख नाही. स्त्रीचे कामजीवन समृध्द केले तर तुमचेही कामजीवन समृध्द होते. हे केवळ परोपकार म्हणून नाही तर तुम्हांलाही चांगले लैंगिक सुख मिळावे म्हणून करणे आवश्यक आहे, हे आग्रहाने सांगितले जात नाही.

यानिमित्ताने वात्सयानाचे कामसुत्र वाचले, आनंदाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये स्त्रीला सुख देणे ही पुरूषाची जबाबदारी आहे, हे आवर्जुन परत परत सांगितले आहे. त्यासाठी पुरूषाने काय करावे हे ही सांगितले आहे. स्त्रीला आनंद देणे यामध्ये पुरूषार्थ हे सांगणारी आपली संस्कृती आहे.

खजुराहो येथील शिल्प पाहिली तर पुरूष स्वत: आनंद घेण्यात मश्गुल नाही, तर तो स्त्रीला आनंद देण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. आपल्या संस्कृतीत लैंगिक शिक्षण हे फार सुसंगत आहे. स्त्री सुखाचा विचार करण्याची ही परंपरा अगदी अलीकडे पर्यंत चालू होती. र. धो. कर्वे यांनी समाजस्वास्थमधून या विषयाची चर्चा, ऊहापोह केला आहे.  ही परंपरा लैंगिक शिक्षणातून अलीकडेच खंडित झाली आहे.

युरोपच्या ख्रिश्चन परंपरेत लैंगिकतेचा विचार केवळ पुर्नत्पादनासाठी करण्याची कल्पना आहे. स्त्रीच्या लैंगिक सुखासाठी पुरूषाने प्रयत्न करणे त्यांच्या धार्मिक चौकटीत मंजूर नाही. त्यामुळे जिथे लैंगिक शिक्षणाचे कार्यक्रम झाले तिथे स्त्रीला आनंद देण्यासाठी लैंगिक सुख हा विचार पुढे आला नाही.

‘अवर बॉडी, अवर सेल्व्ज’ या पुस्तकात स्त्रीला लैंगिक संबंधातून आनंद मिळवून देण्यासाठी पुरूषाने प्रयत्न केला पाहिजे हे आग्रहाने मांडले आहे. संभोग हा ओरबाडून करण्याची, आपल्या सुखापुरती करण्याची कृती नाही. खरे लैंगिक सुख मिळवायचे असेल तर त्याचा मार्ग स्त्रीला सुखी करण्यातून जातो.

लाखातला एक पुरूष बलात्कार करायला प्रवृत्त होतो, अशा हजार पुरूषांमधले निदान पाच सहा पुरूषांना हाच विचार पटला तर ते बलात्कार करण्यापासून प्रवृत्त होतील.

(विचारवेध संस्थेच्या विचार वेच्यांमधील मुक्त शब्दांकन)

Comments

What’s hot